Published On : Thu, Mar 1st, 2018

मुख्यमंत्र्यांसमवेत प्रिन्स आगा खान यांची भेट; विविध सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा

मुंबई : शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स आगा खान यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट घेतली. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली. आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करु, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हॉटेल ताजमहल पॅलेस येथे झालेल्या या बैठकीस पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार अमीन पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदी मान्यवर उपस्थित होते. इमाम आगा खान हे २० फेब्रुवारीपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत.


आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क आणि द आगा खान हेल्थ सर्व्हिसेस यांच्या वतीने मुंबईत लहान मुलांना होणारा कॅन्सर आणि इतर विकारांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत यावेळी चर्चा झाली. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे उपलब्ध असेल. वन पर्यटनातून स्थानिकांना रोजगार, गावांचा विकास, जलसंधारण आदींबाबतही यावेळी चर्चा झाली. महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेल्या पुण्यातील आगाखान पॅलेसला गतवैभव प्राप्त करुन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्र आणि मुंबईशी आपले विशेष आणि अतूट नाते असल्याचे आगा खान यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.