Published On : Thu, Oct 5th, 2017

संत्रा व मोसंबी पीकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना

नागपूर: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेमध्ये संत्र्यांच्या आंबिया बहारांच्या फळांचाही समावेश करण्यात आला असून संत्र्याला विमा संरक्षणासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे. मोसंबी फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत विमा उतरविणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.
पाऊस, वादळ, गारपीठ व सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच फळपीक नुकसानीच्या कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे

आंबिया बहाराच्या फळपिकांना प्रतिकूल घटकांपासून संरक्षणाकरिता जिल्हयातील नागपूर, कामठी, हिंगणा, रामटेक, पारशिवणी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळस्तरावर संत्रा या फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. तर नागपूर ग्रामीण, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळातील मोसंबी या आंबिया बहार फळपिकांना संरक्षण मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

आंबिया बहार 2017-18 साठी संत्रा व मोसंबी फळपिकाकरीता विमा संरक्षित प्रति हेक्टर 70 हजार रुपये असून पीक विमा हप्ता 3 हजार 500 रुपये भरावयाचा आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख मोसंबी फळपिकांकरिता 31 ऑक्टोबर, तर संत्रा फळपिकांकरिता 30 नोव्हेंबर 2017 आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तसेच महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँक व जनसुविधा केंद्रांशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.