नाशिक : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. गोदावरी नदीच्या तीरावर त्यांनी जलपूजनही केले. तसेच नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. यावेळी मोदींनी हातात झाडू घेत स्वच्छता मोहीमही राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अयोध्येत २२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन केले जाते आहे. तसंच रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या आधी देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
तरुणांना केले ‘हे’ आवाहन –
आपल्या देशातील प्रत्येक युवा त्यांची जबाबदारी निष्ठेने आणि सामर्थ्याने पूर्ण करेल हा विश्वास आहे. सशक्त भारताची जी ज्योत आम्ही पेटवली आहे ती अमृतकाळात अमरज्योत बनवा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केले आहे.
स्थानिक उत्पादनाला चालना द्या, मेड इन उत्पादनाला प्राधान्य द्या. कुठल्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. तुमच्या जीवनापासून ते दूर ठेवा. आई बहिणींवरून अपशब्द, शिवीगाळ देण्याची प्रथा असेल त्याविरोधात आवाज उचला. ते बंद करा, असेही मोदी म्हणाले.