नागपूर : कुवारा भिवसन देवस्थान पंचकमेटी, भिवगड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमालपेन जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारंपरिक धार्मिक सोहळ्याला परिसरातील हजारो आदिवासी बांधव येत आहेत. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचा हा उत्सव भाविकांच्या सहभागामुळे अधिकच उत्साही ठरत आहे. आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यावेळी केले.
मंत्री श्री. उईके यांनी आज भीवगड येथील भीमालपेन ठाणा देवस्थानाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पंचकमेटीच्या कार्याचे कौतुक करत भाविकांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा हे आपल्या राज्याचे वैभव आहे. ही परंपरा ही केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्याचे काम सातत्याने करायला हवे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत हे वैभव पोहोचवणे गरजेचे आहे. देवस्थानाच्या विकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे मंत्री श्री. उइके यावेळी म्हणाले.
राज्य शासन आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांच्या प्रथा, परंपरांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देईल. कुवारा भिवसन देवस्थानचा विकास येत्या काळात अधिक गतीने करण्यास कटिबद्ध असल्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल यावेळी म्हणाले.