Published On : Thu, Mar 22nd, 2018

प्लास्टिक पाणी बॉटल नष्ट करणाऱ्या यंत्राच्या माहितीचे सादरीकरण

मुंबई : प्लास्टिक बॉटल मॅनुफॅक्चरिंग असोसिएशनतर्फे आज मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पाणी बॉटल नष्ट करणाऱ्या यंत्राची माहिती सादरीकरणातून देण्यात आली.

सध्या गुडगाव शहरात अशी 25 यंत्रे कार्यरत असून त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणतीही छोटी-मोठी प्लास्टिक पाणी बॉटल यंत्रात टाकून ग्राहक एक रुपया घेऊ शकतो. ‘एक बॉटल यंत्रात टाका आणि एक रुपया मिळवा’ ही घोषणा गुडगाव शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

या यंत्रामध्ये 600 बॉटलची क्षमता असून क्रश झालेल्या बॉटल्स काढून नव्याने पुन्हा यंत्र काम करते. साधारणत: फ्रीजच्या आकाराचे हे यंत्र असून त्याची किंमत 3 लाख 50 हजार पर्यंत आहे. या यंत्राला जागा कमी लागते ते वीजेवर चालते. प्रायोगिक तत्वावर असे यंत्र मुंबईमध्ये लावण्याबाबत विचार करणार असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी.अन्बल्गन, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.