कोल्हापूर -छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अखेर सशर्त जामीन मंजूर केला आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरटकर न्यायालयीन कोठडीत होता.
या प्रकरणी कोरटकरवर अशीच कलमे लावण्यात आली होती की ज्यात तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत नाही. त्यामुळे त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. जामिनावर दोन दिवसांपूर्वीच सुनावणी झाली होती आणि आज कोर्टाने आपला निर्णय जाहीर करत जामीन मंजूर केला.
दरम्यान, इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी या जामिनावर नाराजी व्यक्त करत कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, कोरटकरला अशा प्रकारे जामीन देणे न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर आहे. त्यांनी याविरोधात पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे कोरटकरने आपल्या जामीन अर्जात सावंत यांच्यावरच छत्रपतींच्या अवमानाचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देत सरोदे यांनी कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला आहे.
प्रशांत कोरटकरला मिळालेल्या जामीनामुळे या प्रकरणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस या खटल्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.