Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 2nd, 2018

  भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची 3 जानेवारी ला महाराष्ट्र बंदची हाक


  मुंबई: भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी राज्यभरात उमटत असलेल्या हिंसक पडसादावर बोलताना सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी. सर्वसामान्यांना त्रास होईल असं काही करु नका असं म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केलं आहे.

  ‘त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो, पण आऊट ऑफ कव्हरेज होते. पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा माझा आरोप आहे’, असं प्रकाश आंबेडकर बोलले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांची कुमक घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. तसंच कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं अनुदान बंद करावं अशी मागणीही केली.

  दरम्यान काही आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत. आज सकाळी 11:45 वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे अर्ध्या तासांनंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली.

  एका तासानंतर हार्बर रेल्वेवरील गोवंडी येथे अडकलेल्या रेल्वे सुरू झाली असून. गोवंडी रेल्वे स्थानक ते चेंबूर स्थानकदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त आहे. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

  सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी माहिती पडताळून घ्या
  भीमा कोरेगाव प्रकरणाचे राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. मुलुंड, कुर्ला परिसरात बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. तसंच सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी माहितीची खात्री करुन घेतल्यानंतरच पोस्ट करावे, असेही सांगण्यात आले आहे. आंदोलनामुळे इस्टर्न एक्स्प्रेसवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, चेंबूर नाक्यावरील वाहतूक अद्यापही खोळंबलेली आहे.

  सोशल मीडियावर अफवा पसरवणा-यांवर कारवाई करू – मुख्यमंत्री
  भीम कोरेगाव प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार आहे. या घटनेत ज्या युवकाचा मृत्यू झाला. त्याची हत्या समजून सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. याचबरोबर, मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यभरात ज्याठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्याठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्यांवर कारवाई करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145