Published On : Wed, Aug 17th, 2022

स्वातंत्र्योत्तर देशाला खऱ्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज : अॅड. धर्मपाल मेश्राम

Advertisement

नारी येथील फारूके आजम मदरसामध्ये ध्वजारोहण

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमूल्य योगदान देणाऱ्या अनेक वीरांची माहिती पुढे येऊ दिली गेली नाही. खरा इतिहास लपविण्याचे कारस्थान स्वातंत्र्योत्तर काँग्रेसच्या कार्यकाळात करण्यात आले. त्यामुळे आज देशाला खऱ्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.

स्वातंत्र्यदिनी सोमवारी, १५ ऑगस्ट रोजी नारी, समता नगर येथील फारूके आजम मदरसामध्ये अॅड. मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मदरसाचे अध्यक्ष हाफीज असिर खान, सदस्य माजी सैनिक शकील अहमद, सदस्य रिजवान अंसारी, आफताब आलम, हाजी अब्दुल माबुद, लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.

बंगालमधील अवधचे नवाब वाजीद अली शाह यांनी ब्रिटिशांना थोपविण्याचे काम केले. त्यांनी बंगालमध्ये ब्रिटिशांना पाय ठेवू दिले नाही. एवढेच नव्हे तर नवाब वाजीद अली शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी बेगम हजरद महल यांनी लढा सुरू ठेवला. १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात बेगम हजरद महल यांची महत्वाची भूमिका होती. राणी लक्ष्मीबाई यांच्या बरोबरीची क्रांती त्यांनी केली. मात्र स्वातंत्र्यानंतर लिहिण्यात आलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

एवढेच नव्हे तर ज्या संघटनांवर आज बोट उचलले जाते. त्यातीलच हुसैन अहमद मदानी यांनी १८७९मध्ये ‘टू नेशन थेअरी’ म्हणजे दोन राष्ट्रांच्या परिभाषेचा कडाडून विरोध केला होता. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पोहोचताना या सर्व गोष्टी इतिहासात लुप्त झाल्या. आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही, ही खेदाची बाब आहे.

ज्या मातीत आपला जन्म होतो व जिथून आपला उदरनिर्वाह चालतो, ती माती, तो देश आपला अभिमान आहे. या देशात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती देशाची नागरिक आहे. देशात ज्या प्रकारचा राग मनात भरलेला तो चुकीचा आहे. इतिहासातील घटनांचा योग्य अभ्यास होण्याची गरज आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी प्रामाणिकपणे आता असा पुढाकार घेतला आहे व आपण सगळ्यांनी त्यात आपापले योगदान देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.