Published On : Sat, May 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ओबीसी जनगणनेवरून राजकारण तापलं; खोपडे यांचा वडेट्टीवारांवर थेट हल्ला

Advertisement

नागपूर : राज्यात सुरू झालेल्या स्व-जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

वडेट्टीवार यांनी स्व-जनगणना आणि आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना खोपडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत, २०११ नंतर पुन्हा सुरू झालेली जनगणना ही देशासाठी महत्त्वाची पायरी असल्याचे म्हटले.

राज्यात १ ते १५ तारखेपर्यंत स्व-जनगणना प्रक्रिया राबवली जात असून त्यानंतर अधिकारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत ओबीसींसह सर्व घटकांची नोंद केली जाणार असल्याचे खोपडे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, खोपडे यांनी वडेट्टीवारांवर टीका करताना “आरोप करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला आहे” असा घणाघात केला. “काँग्रेसने अनेक वर्षे सत्तेत राहूनही ओबीसींसाठी ठोस काम केले नाही. वडेट्टीवार मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिले, त्यांनी ओबीसींसाठी नेमके काय केले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Advertisement

तसेच, राज्यात ओबीसी मंत्रालय आणि स्वतंत्र मंत्रीपदाची निर्मिती ही सत्ताधाऱ्यांची मोठी कामगिरी असल्याचा दावा करत, २०१४ पासून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, वसतिगृहे आणि विविध सवलती उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.