Published On : Wed, Sep 30th, 2020

हवालदारानेच लुटला पोलिसांचा खजिना, सेवानिवृत्तीच्या दिवशी गुन्हा दाखल

Advertisement

रामचंद्र टाकळखेडे हे सक्करदरा पोलिस ठाण्यात २०१२ पासून कार्यरत होते. त्यांच्याकडे तेथील मालखान्याची जबाबदारी होती. त्यांनीही कधीही दुसरी नोकरी केली नाही. गेल्या आठ वर्षांत विविध कारवाईंमध्ये जप्त करण्यात आलेली मालमत्ता मालखान्यात जमा होती.

नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराने ठाण्यातील पोलिसांचाच खजिना (मालखाना) लुटला. हवालदाराने चक्क खजिन्यातील १६ लाखांचा ऐवज लंपास केला. रामचंद्र टाकळखेडे असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. हवालदाराच्या सेवानिवृत्तीच्याच दिवशीच हा गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र टाकळखेडे हे सक्करदरा पोलिस ठाण्यात २०१२ पासून कार्यरत होते. त्यांच्याकडे तेथील मालखान्याची जबाबदारी होती. त्यांनीही कधीही दुसरी नोकरी केली नाही. गेल्या आठ वर्षांत विविध कारवाईंमध्ये जप्त करण्यात आलेली मालमत्ता मालखान्यात जमा होती. यादरम्यान त्याने मालखान्यात जमा करण्यात आलेले दागिने व रोख स्वत:च्या फायद्याकरिता लंपास केली.

दरम्यान परिमंडळ चारची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर काम करणाऱ्यांची बदली करण्यात यावी किंवा त्यांचे काम बदलण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानंतर टाकळखेडे यांच्याकडून मालखान्याची जबाबदारी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपवण्यात येणार होती. त्याकरिता आजवर जमा करण्यात आलेली मालमत्ता व त्याचा हिशेब घेत असताना अनेक व्यवहारात तफावत दिसली.

गेली महिनाभर चौकशी करण्यात आली असता १६ लाखांचा मुद्देमाल कमी दिसला. हा मुद्देमाल परत करण्यासाठी त्याला संधी देण्यात आली. पण, तो केवळ वेळकाढूपणा करीत होता. शेवटी सोमवारी पोलिसांनी शासकीय जबाबदारी सांभाळताना संपत्तीचा अपहार करणे व फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच तो पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.