Published On : Mon, Jun 22nd, 2020

महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटला! तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

Advertisement

स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढेंवर ठेवण्यात आला आहे

नागपूर: पुणे शहरापाठोपाठ नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या तोंडावर संकटाशी दोन हात करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकाच्या पाच हॉस्पिटलचा कायापालट केला आहे. तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलं असं म्हणत, त्यांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत असताना नागपुरात महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटला आहे.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप तुकाराम मुंढेंवर ठेवण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते…
नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपविरुद्ध आयुक्त असा वाद पेटला आहे. राज्यात आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असा दावा काही दिवसांपूर्वी महापौर संदीप जोशी यांनी केला होता. नागपूर शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावाला महापालिका प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला आहे.

आयुक्तांना थेट निशाणा..
नागपुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरलं आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहे, असा घणाघाती आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे.

तुकाराम मुंढेंच्या बदलीत स्वारस्य नाही…
दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत संदीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीत भाजपला कोणतेही स्वारस्य नाही, ज्यांनी मुंढेंना नागपुरात आणलं, तेच लोक लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. आमची राज्यात सत्ता असती तर तुकाराम मुंढे नागपुरात नसते, असंही महापौर संदीप जोशी यांनी म्हटलं आहे.