नागपूर : जुनी कामठी पोलिसांनी गोपनीय माहितीनंतर केलेल्या कारवाईत एका ४२ वर्षीय व्यक्तीस गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा लाल मदरसा जवळ, वारीसपुरा परिसरातील आरोपीच्या राहत्या घरी करण्यात आली.
पोलीस ठाणे जुनी कामठी येथे दाखल गुन्ह्यानुसार (गु. क्र. 437/2025), आरोपी मोहम्मद शाहिद मोहम्मद इजाज (रा. लाल मदरसा जवळ, वारीसपुरा, कामठी) हा विक्रीसाठी गांजा साठवून ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय पंचांच्या उपस्थितीत घरझडती घेण्यात आली.
या कारवाईत किचनमधील लोखंडी अलमारीखाली पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेला एकूण ३५१ ग्रॅम गांजा (किंमत सुमारे ₹७,०२०) जप्त करण्यात आला. मुद्देमाल पंचा समक्ष पॅक करून सील करण्यात आला असून, आरोपीस ताब्यात घेऊन NDPS कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(A) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पो.हे.कॉ. अब्दुल कलीम शेख यांच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, पुढील तपास जुनी कामठी पोलिस करीत आहेत.