Published On : Mon, Aug 6th, 2018

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं

Advertisement

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत मोदींना माहिती दिल्याचं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजप खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मराठा आंदोलनाबाबत राज्यातील सर्व पोलिस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी पत्र जारी केलं आहे. आंदोलनातील गुन्ह्यांची माहिती कळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून चौकशीनंतर हे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेली दोन वर्षे शांततेत मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ‘ठोक मोर्चे’ सुरु केले आणि यातून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील काही ठिकाणी मराठा समाज आक्रमकही झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सरकारी पातळीवरील हालचालीही वेगवान झाल्या. त्यानंतर विरोधी पक्षांसह सरकार दरबारीही बैठकांवर बैठका होऊ लागल्या.

मराठा समाजाला शांतता बाळगण्याच्या आश्वासनासह आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. मात्र तरीही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका मांडणार, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.