Published On : Tue, Aug 11th, 2020

स्वातंत्र्य दिनी प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये

Advertisement

– प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर न्यायालयाची बंदी

नागपूर : राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्वाच्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर हे राष्ट्रध्वज मैदानात व रस्त्यावर पडलेले असतात व त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्याकरीता उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत.

सोबतच कागदी व प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्याकरीता जनजागृती करण्याची सुचना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी कुणीही प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

1 जानेवारी 2015 च्या शासन निर्णयानुसार प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सुर्यास्तानंतर व सुर्योदयापुर्वी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपुर्वक नष्ट करण्यात यावेत.

तसे करतांना सर्वांनी उभे रहावे व ते पुर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कुणीही जागा सोडू नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरीता जिल्हयातील सामाजिक संघटना, नागरी, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.