Published On : Mon, Feb 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

परीक्षांचा ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन करुन सकारात्मकतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला-

Advertisement

मुंबई – जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा आणि लहान लहान उद्दिष्ट ठेवून ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचे ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून यश नक्की मिळेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आज शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. विचारांना मनात दाबून न ठेवता कोणतेही वय असो, लिहिण्याची सवय कायम ठेवावी, त्यातून आपले मत व्यक्त होत असते.


अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असते, असे सांगून पंतप्रधान श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्ग, सिझनल फूड, नवनवीन तंत्रज्ञान, नेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना एक पेड मा के नाम अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता, त्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

मनातील भीतीवर विजय मिळवून व्हॅल्यू ॲडिशन करा – देवेंद्र फडणवीस

आव्हाने ही सर्वांसमोर असतात. सकारात्मकतेने त्यावर मात करावी, असे आवाहन करून विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा. सरावाने सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतो, यामुळे पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

ते म्हणाले, केवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा यादृष्टीने पंतप्रधानांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताचा चेहरा बदलला आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान मिळावे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ.अदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Advertisement
Advertisement