नागपूर स्मार्ट सिटी च्या कार्याची माहिती
नागपूर : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रतिनिधी मंडळाने नुकतीच नागपूर शहराला भेट देऊन शहरातील विकास कामांची माहिती घेतली. याच अनुषंगाने प्रतिनिधी मंडळाने नागपूर स्मार्टअँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयाला भेट देऊन नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांची माहिती घेतली.
पिंपरी-चिंचवड मनपा प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सह शहर विकास अभियंता श्रीकांत सवाने यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज’ आणि ‘स्ट्रीट फॉर पिपल चॅलेंज’ या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यात आला होता. पिंपरीमध्ये मागील काही वर्षांपासून प्रदूषण रहित वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मागच्या वर्षी आणि या वर्षी मोठ्या स्वरूपात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
एनएसएससीडीसीएलच्या पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी नागपूरमध्ये स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येणाऱ्या कामांची व उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपूर शहराला ‘इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज’ स्पर्धेमध्ये एक कोटींचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नागपूरची ‘स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज’ स्पर्धेमध्येसुद्धा निवड झाली आहे. नगर रचनाकार हर्षल बोपर्डीकर यांनी प्रतिनिधी मंडळासमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीतर्फे ‘नर्चरिंग नैबरहूड प्रकल्प’ सक्करदरा परिसरात राबविण्यात येत असून या चॅलेंज अंतर्गत निवड झालेले महाराष्ट्रातील नागपूर हे एकमेव शहर आहे.
नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य नियोजक राहुल पांडे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि या प्रकल्पामागील संकल्पना त्यांनी सांगितली. या संकल्पनेलासुध्दा नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत आहे.
मुख्य नियोजक राहुल पांडे यांनी ‘एरिया बेस्ड डेव्हलपमेंट प्रकल्पा’बद्दलसुध्दा माहिती दिली. अविकसित पारडी, पुनापूर , भांडेवाडी आणि भरतवाडामध्ये नगर रचना परियोजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प राविण्यात येत आहे. तसेच सदर परियोजनेमध्ये प्रस्तावित विकासकामाची त्यांनी माहिती सादर केली.
प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले कि, पिंपरीमध्ये महानगरपालिकेच्या मदतीने प्रकल्प पूर्ण केले जात आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रतिनिधी मंडळात अधिकारी प्रमोद ओंभासे, बापूसाहेब गायकवाड, संजय साली, संजय काशीद, रवींद्र सूर्यवंशी, चंद्रशेखर धानोरकर, सायकल मेयर आशिक जैन, सुनील पवार, अरविंद पाटील, संतोष कुदळे, प्रांजळ कुलकर्णी यांचा समावेश होता. तर नागपूर स्मार्ट सिटीतर्फे डॉ. पराग अंर्मल , अमित शिरपूरकर आणि मनीष सोनी यांची उपस्थिती होती.

