Published On : Wed, Dec 13th, 2017

महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसह परिवर्तनाचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूर: ‘महाराष्ट्र माझा’ हे छायाचित्र प्रदर्शन केवळ छायाचित्रकारांच्या कलेचा आविष्कार नसून, सुंदर आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. निसर्ग, व्यक्ती, संस्कृती, प्राणी, प्रथा व परंपरा यांचे उत्कृष्ट छायाचित्रण यात आहे. शिवाय शासकीय उपक्रमाने घडणारे परिवर्तनही यात बघायला मिळते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन नागपूर येथे शासकीय मध्यवर्ती संग्रहालयाच्या कला दालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर नोंदवहीत त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया नोंदवली.

यावेळी शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक मोहन राठोड उपस्थित होते.


महाराष्ट्र माझा ही छायाचित्र स्पर्धा माहिती व जनसंपर्क विभागाने राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातून सुमारे 350 पेक्षा जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त तसेच उत्कृष्ट छायाचित्रांमधून ‍निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. पंढरपूरच्या वारीतील दिव्यांग वारकऱ्यांची फुगडी, दूत स्वच्छतेचा, देशाच्या सुरक्षतेत नारीशक्तीचे योगदान, आणि उत्तेजनार्थ बैलगाडी शर्यतीतील महिला, सावित्रीच्या लेकी, बेटी बचाव-बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, पर्यटन, सांस्कृतिक परंपरेचे प्रदर्शन या छायाचित्रांमधून घडते.


महाराष्ट्र माझा हे छायाचित्र प्रदर्शन दिनांक 15 डिसेंबर पर्यंत विनामूल्य सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समोरील गुप्ता हाऊस जवळील चौकातून अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्याने मध्यवर्ती संग्रहालयाच्या (अजब बंगल्या)च्या प्रदर्शन गॅलरीत सहजपणे भेट देता येईल. हा रस्ता प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतासाठी सुरु राहणार आहे. महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विनामूल्य सर्वांसाठी खुले राहणार आहे.