| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 26th, 2018

  देशातील ‘फार्मसी’ कंपन्या संशोधनाप्रति उदासीन : हंसराज अहिर

  नागपूर : भारतात सर्वात जास्त प्रमाणात ‘फार्मसी’ कंपन्या आहेत. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये भारतातून औषधे निर्यात केली जातात. मात्र असे असतानादेखील संशोधनासाठी या कंपन्या पुढाकार घेत नाही. त्यांची संशोधनाप्रति असलेली ही उदासीनता एकाप्रकारे बेईमानीचाच प्रकार असल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ‘सीएसआयआर’च्या (कौन्सिल आॅफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) ७६ व्या स्थापनादिन समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बुधवारी बोलत होते.

  ‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जी.एच.रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजन वेळूकर, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात ‘फार्मसी’ कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र संशोधनाबाबत या कंपन्या आपली जबाबदारी झटकून देतात. इतर देशांतील ‘पेटंट’वर आधारित औषधे बनवण्याचेच काम करण्यात कंपन्या धन्यता मानतात.

  मात्र देशाला समोर न्यायचे असेल तर सर्वच क्षेत्रात संशोधनाचे प्रमाण वाढवावे लागेल, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी केले. डॉ.राजन वेळूकर यांनी यावेळी विज्ञान व समाज यांची सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. समाजाला समजल्याशिवाय तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही. पुढील पिढ्यांचा विचार करुन नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले. डॉ.राकेश कुमार यांनी प्रास्ताविकादरम्यान ‘नीरी’च्या कार्यावर प्रकाश टाकला. देशातील विविध शहरांमधील वायू, जल, भूमी प्रदूषणासंदर्भात ‘नीरी’ सातत्याने कार्य करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अर्बन मॅनेजमेंट’चेदेखील उद्घाटन करण्यात आले. तसेच वर्धापनदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘नीरी’त अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला. प्रकाश कुंभारे यांनी संचालन केले तर डॉ.पांडे यांनी आभार मानले.

  ‘स्मार्ट’ गावांची आवश्यकता
  आपला देश हा नेहमी सृष्टीपूजक राहिला आहे. आपल्या पारंपरिक विचारांमध्ये पर्यावरणाचे संवर्धन समाविष्ट होते. विज्ञानासोबतच आता त्या जुन्या बाबींवरदेखील विचार झाला पाहिजे. ‘स्मार्ट’ शहरांसोबतच ‘स्मार्ट’ गावांचीदेखील आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हंसराज अहीर यांनी यावेळी केले.

  १०४ शहरांतील हवा प्रदूषित
  आपल्या देशात वायुप्रदूषण ही एक ज्वलंत समस्या आहे. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’च्या अहवालातून ही बाब समोर आली होती. मात्र वैज्ञानिक आकडेवारीनुसार १०४ शहरांतील हवा प्रदूषित असल्याची माहिती डॉ.राकेश कुमार यांनी दिली.

  विद्यार्थ्यांचा झाला सत्कार
  ‘नीरी’तर्फे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’चेदेखील आयोजन करण्यात आले. यात विविध ‘मॉडेल्स’ व संकल्पनांचे सादरीकरण झाले. तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. यात बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हील लाईन्स-श्रीकृष्णनगर), सेंटर पॉर्इंट स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सरस्वती विद्यालय, दिल्ली पब्लिक स्कूल, सांदिपनी स्कूल, मुंडले इंग्लिश स्कूल, केंद्रीय विद्यालय (वायूसेनानगर), टाटा पारसी या शाळांच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145