Published On : Tue, Oct 31st, 2017

…तर मिळेल पेट्रोल 43 तर डिझेल 41 रुपये लिटर

Advertisement

600599-fadnavis9
मुंबई: राज्याचे 22 वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारला आज (मंगळवार) तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री उत्‍कृष्‍ट वक्‍ते, राजकारणी तसेच वादविवादपटू आहेत. यासोबतच त्यांच्याकडे कल्पकताही आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर 43 रुपयांपर्यंत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला नवी आयडिया सुचवली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास दर 43 रुपयांपर्यंत खाली येतील, असे मतही मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची विनंती केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूडी 2 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोलवर 2 रुपयांनी आणि डिझेलवर 1 रुपयांनी कर कमी केला होता. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

जीएसटीच्या कक्षेत आल्यास जास्तीत जास्त 28 टक्के कर…
केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत घेतल्यास त्यावर जास्तीत जास्त 28 टक्के कर लावण्यात येईल. परिणामी पेट्रोलचे दर 43 तर डिझेलचे दर 41 रुपयांपर्यंत खाली येतील.