Published On : Fri, Dec 22nd, 2017

मनपाचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारीपासून वैयक्तिक व सांघिक स्पर्धेचे विशेष आयोजन


नागपूर: शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक स्तर वाढविण्यासाठी महानगरपालिका दरवर्षी शिक्षण सप्ताहाचे आयोजन करीत असते. या वर्षीचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारी ते १८ जानेवारी २०१८ या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिली. शुक्रवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील क्रीडा समितीच्या कार्यालयात आयोजित आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा अधीक्षक नरेश चौधरी, क्रीडा विभागाचे नरेश सवाईथूल प्रामुख्याने उपस्थित होते.

यावर्षीच्या शिक्षण सप्ताहामध्ये ८ जानेवारीपासून वर्ग १ ते ४ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २०० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) तर सांघिक स्पर्धेत कबड्डी, फुटबॉल, लंगडी, टग ऑफ वॉर या स्पर्धांचा समावेश असेल. वर्ग ५ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २००, ४०० मी. धावणे, लांब उडी, ट्रिपल जंप, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) आदी स्पर्धांचा समावेश असेल. या स्पर्धा प्रथमतः झोन स्तरावर आयोजित करण्यात येतील. झोन स्तरावरील वैयक्तिक १, २, ३ क्रमांकांना तसेच सांघिक खेळामध्ये विजयी व उपविजयी संघांना क्रेंद्रीय स्थळी सहभागी करण्यात येईल.

या स्पर्धांसोबतच निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धेचे आयोजन विभागाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा निरिक्षक नरेश सवाईथूल यांनी दिली.