Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 20th, 2020

  लोकप्रतिनिधींनी प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवावा – पालकमंत्री

  नागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या कठीण प्रसंगात जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवून कार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नगरसेवकांना केल्यात.

  विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात नगरसेवक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार आशिष जैस्वाल, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, मनोज गावंडे, बंटी शेळके यांच्यासह इतरही नगरसेवक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंडे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

  नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे इतर शहरांच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनी चांगले काम केले आहे. सर्वजण कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही परिस्थिती सामंजस्याने हाताळण्याची आहे. गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण, अन्नधान्याच्या कीट्स, राज्य शासनाकडून जे-जे शक्य आहे ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

  शिजवलेले अन्न शासन आणि प्रशासन कम्यूनिटी किचनच्या माध्यमातून देत आहोत. जबाबदार नागरिक म्हणून काम करणे आवश्यक असून, हा अदृश्य शत्रू आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, तो नियंत्रणात राहावा, यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासन अविरत परिश्रम घेत आहे. त्यामुळे या संकटावर सर्वजण मात करु, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.

  राज्य शासन कोरोनावर मात करण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीही जिल्हा प्रशासनासोबत सतत आढावा बैठका घेत असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. तसेच जनधन योजना आणि बांधकाम कामगारांच्या यादीमध्ये चुकीची आणि गरजवंत नसलेल्या नागरिकांची नावे आली आहेत. त्या नागरिकांनी बांधकाम कामगार म्हणून राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या निधीची उचल केली असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे अपात्र नागरिकांनी स्वत:हून पुढे येत शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

  विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी लोकप्रतिनिधींनी या संकटकाळात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. शांततेने आणि तितक्याच तत्परतेने काम करण्याची लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर वेळ आली आहे. सर्वांचे असेच सहकार्य मिळाल्यास नक्कीच मात करु. मात्र त्यासाठी धैर्य बाळगण्याची गरज विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी व्यक्त केली.

  जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अविरत चालू असून तो सामाजिक अंतर ठेवल्या जात आहे. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर येत असले तरीही पोलिस प्रशासन नियंत्रण मिळवत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार आणि नगरसेवकांनीही नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याविषयी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आवाहन केले.

  जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. काही ठिकाणी शिधापत्रिकांबाबत तक्रारी आल्या असून, त्या दूर करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. तसेच इतरही तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी केले.

  महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्या भागात टप्प्याटप्प्याने निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे. आजघडीला शहरात 80 टक्क्यापेक्षा जास्त भागात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य नाही. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या आणि ते हॉटस्पॉट तयार झालेल्या भागामध्ये निर्जंतुकीकरण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मानवी शरीरास घातक असे घटक त्यात असल्याचे सांगून लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनी स्वत:हून निर्जंतुकीकरण करू नये, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले.

  मनपा क्षेत्रातील निवारा गृहे, कम्युनिटी किचन, जीवनावश्यक असलेल्या वस्तुंच्या किट्स, शिजवलेले अन्न गरीब व गरजू व्यक्तींपर्यंत पोहाचविण्याचे काम मनपा प्रशासन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करत आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून वेगवेगळे संपर्क क्रमांक वेळोवेळी जाहीर केले आहे. शिवाय मनपाने वेगवेगळ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी मोबाईल ॲप ही सुरु केले आहेत. नागरिकांनी त्यावर ऑनलाईन तक्रार केल्यास ती सोडविण्यास सोपे जाईल, असेही त्यांनी सांगितले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145