
नागपूर: महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करावे, असे थेट आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महामेट्रोच्या आर्थिक स्थितीवर गंभीर आरोप करत नागपूरकरांना इशारा दिला.
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, सध्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली महामेट्रो पावणे दोन हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. येत्या काही वर्षांत मेट्रो प्रकल्पाचे संचालन संबंधित महानगरपालिकांकडे सोपवले जाणार आहे. अशा परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेवर या तोट्याचा आर्थिक भार टाकला जाणार असून, ज्या मनपाचे वार्षिक बजेट अवघे पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांचे आहे, त्या मनपासाठी हा भार असह्य ठरेल.
महामेट्रोसारखा ‘पांढरा हत्ती’ पोसण्याची जबाबदारी मनपावर आल्यास नागपूरकरांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवर गदा येईल. त्यामुळे शहरातील पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते यांसारख्या सुविधा टिकवायच्या असतील, तर भाजपला मतदान करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
परराष्ट्र धोरणावरून मोदी सरकारवर टीका-
देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुखांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास असल्याचा आरोप केला. एकीकडे पंतप्रधान चीनला मित्रदेश म्हणत असताना, दुसरीकडे लष्करप्रमुख चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगत आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालय आणि लष्कराच्या भूमिकांमध्ये इतका विरोधाभास दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.या विषयावर राष्ट्रीय पक्ष मौन बाळगत असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
‘विश्वगुरु’ संकल्पनेवर प्रश्नचिन्ह-
भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडले असल्याचा आरोप करत त्यांनी ‘विश्वगुरु’ या संकल्पनेची खिल्ली उडवली. अमेरिका, युरोप आणि इतर देशांशी भारताचे संबंध तणावपूर्ण झाले असून, डोनाल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी यांच्यात अहंकाराची लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून भारत मोठ्या प्रमाणात नफा कमवत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, हा नफा नेमका देशाच्या तिजोरीत जातो की काही मोजक्या उद्योगपतींच्या खात्यात, असा सवाल त्यांनी केला.
संभाव्य युद्धाचा इशारा-
लष्करप्रमुखांनी दिलेल्या संभाव्य युद्धाच्या इशाऱ्याचा संदर्भ देत, भारतावर आर्थिक आणि राजकीय दबाव टाकण्याचा आंतरराष्ट्रीय कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तान आणि बांगलादेशचा वापर करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरातील मतदारांची जबाबदारी अधिक असल्याचे सांगत, भाजपला मतदान न केल्यास सत्ताधाऱ्यांचा अहंकार कमी करता येईल, असा टोला त्यांनी लगावला.
राजकारणातील पैशांच्या प्रभावावर बोट-
निवडणुकांमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याचा आरोप करत, भाजपच्या सत्ताकाळातच भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार फोफावल्याचे त्यांनी सांगितले.
युती आणि लोकशाहीवर टीका-
वंचित बहुजन आघाडीची युती न झाल्याबाबत बोलताना, सत्ताधारी पक्ष दबाव आणि ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील राजकीय पक्षांचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गंभीर विधानही त्यांनी केले.
नागपूरच्या विकासाचा वेगळा दृष्टिकोन-
नागपूरच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपत्कालीन हब बनवण्याची संकल्पना मांडली. नागपूरच्या वरून दररोज शेकडो आंतरराष्ट्रीय उड्डाणे जात असून, येथे दुरुस्ती व आपत्कालीन सेवा केंद्र उभारण्याची मोठी संधी आहे. वंचितला सत्ता मिळाल्यास नागपूर मनपाचे बजेट ४२ हजार कोटी रुपयांपर्यंत नेऊ, असा दावा त्यांनी केला.
सिमेंट रस्त्यांवर आक्षेप-
उन्हाळ्यात तापमान ४० अंशांच्या पुढे जाणाऱ्या शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधणे चुकीचे असून, यामुळे तापमान आणखी वाढते व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, अशी टीकाही त्यांनी केली.
शेवटी थेट आवाहन-
लोकशाही टिकवायची असेल, राजकीय पक्षांचे अस्तित्व जपायचे असेल आणि शहराच्या मूलभूत गरजा वाचवायच्या असतील, तर नागपूरकरांनी कोणालाही मतदान करावे, मात्र भाजपला करू नये, असे थेट आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.








