
नागपूर – महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. 23) सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी शहरातील कोणत्याही झोन कार्यालयात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025-26 साठी शहरातील 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांना त्यांच्या झोनमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही पहिल्या दिवशी सर्वच झोन कार्यालयांत अर्ज न दाखल होण्याची स्थिती कायम राहिली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असून, 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 2 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.








