Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पवार साहेब कधीच थांबणार नाहीत;शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांना फडणवीसांकडून पूर्णविराम!

Advertisement

पवार साहेब कधीच थांबणार नाहीत;शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चांना फडणवीसांकडून पूर्णविराम!

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून आणि समाजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. येत्या १२ डिसेंबरला वाढदिवसाच्या निमित्ताने ते याबाबत घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांच्या सक्रियतेचा दाखला देत त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सर्वांची इच्छा असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, पवार आजही विविध प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांमध्ये रस घेत आहेत. त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली असून, ते सातत्याने काही ना काही सकारात्मक काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे योग्य नाही. ते आयुष्यात कधीही थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

### कोयनेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळवण्याच्या चर्चेवरही फडणवीस यांनी भाष्य केले. या विषयावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, केवळ संभाव्य पर्यायांचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर जवळपास ६० टीएमसी पाणी समुद्रात वाहून जाते. या पाण्याचा उपयोग करण्यासाठी ते उचलून वर आणण्याचा पर्याय तपासला जात आहे. मात्र, ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने त्याचा सविस्तर अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

या पाण्याचा वापर केवळ मुंबईसाठीच नव्हे, तर दुष्काळग्रस्त भागांसाठीही करता येऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी या पाण्याचा उपयोग करण्याचे नियोजन विचाराधीन आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यावरील भार कमी करण्यासोबतच कोकणातील नेत्यांच्या मागण्यांचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोयनेचे पाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी त्याचा दुष्काळी भागांना लाभ मिळावा, या दृष्टीने सरकार विचार करत आहे. अद्याप अभ्यास पूर्ण झालेला नसताना या विषयावरून वाद निर्माण करणे योग्य नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

दरम्यान, कामठी येथील आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा २७ वा वर्धापन दिन महोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान साजरा होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, ओगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.