Published On : Thu, Aug 24th, 2017

पवारांचाच ‘अंदाज’ चुकला, हवामान विभागात वाटली 100 किलो बारामतीची साखर

Advertisement

पुणे- ‘येत्या चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार खरेच पाऊस पडला तर मी बारामतीची साखर हवामान खात्याच्या मुखी घालीन’, असे खाेचक विधान करून सोशल मीडियावर चर्चेत अालेले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना स्वत:चा ‘अंदाज’ चुकवल्याबद्दल बारामतीची साखर खरोखरच हवामान विभागात पाठवली. बारामतीचे हे ‘गोड’ ओझे पवार यांचे निष्ठावंत अंकुश काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी हवामान खात्याच्या सुपूर्द केले.

बारामती येथे गेल्या आठवड्यात आयोजित कार्यक्रमात हवामान खात्याच्या हमखास चुकणाऱ्या अंदाजांवर टिप्पणी करताना शरद पवार यांनी उपरोक्त उद्गार काढले होते. पवार यांच्या या विधानावर खूप चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात उत्तम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आणि संपूर्ण महाराष्ट्र दाेन दिवस चिंब झाला. कधी नव्हे तो पवार यांचा ‘अंदाज’ चुकला आणि जाहीर कार्यक्रमात दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी पवार यांच्यावर आली. साेशल मीडियावरही त्यांचा नेटीझन्सनी समाचार घेतला. त्याची दखल घेत पवारांनी शंभर किलो साखरेचे पोते ( क्यूबच्या छोट्या पाऊचनी भरलेले) बुधवारी अंकुश काकडे यांच्यामार्फत हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात पाठवले.

चेष्टेचा हेतूच नव्हता : काकडे

काकडे म्हणाले, ‘पवार साहेब हवामान विभागाविषयी जे बोलले त्यात हवामान खात्याची चेष्टा करणे किंवा खिल्ली उडवण्याचा हेतू अजिबात नव्हता. साहेब स्वत: कृषिमंत्री असताना त्यांनीच हवामान विभागासाठी विविध यंत्रसामग्री, नवी उपकरणे यासाठी मदत केली होती. त्यामुळे हवामान खात्याच्या अवमानाचा हेतू नव्हता. तरीही स्वत:चा अंदाज चुकल्याबद्दल पवार यांनी हवामान खात्याला साखर पाठवली.’

Gold Rate
19 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000/-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,98,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement