
नागपूर : ठाकरे बंधूंनी आज काढलेला मोर्चा हा जनतेच्या प्रश्नांसाठीचे आंदोलन नसून केवळ रविवारी पिकनिक काढून माध्यमांच्या चर्चेत राहण्याचा आणि आपले संपलेले राजकीय अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता, अशी टीका भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.
माध्यमांशी बोलताना फुके म्हणाले की, “आजचा ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. स्वतःची संपलेली राजकीय दुकानदारी वाचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता,” असा घणाघात त्यांनी केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांबाबत विरोधकांकडून गंभीर आक्षेप घेण्यात आले होते. राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये अनियमितता असल्याचे आरोप केले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही मतदार यादीतील कथित चुका निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. दुबार-तिबार नावे असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया सुरू केली, असा दावा डॉ. फुके यांनी केला.
SIR प्रक्रिया राबविताना निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचे आणि BLO नियुक्त करून प्रक्रिया पुढे नेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मनसे आणि उबाठा गटाने एकही BLO नियुक्त केला नाही, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने BLO नियुक्त केले, मात्र त्यांनीही अपेक्षित पद्धतीने काम केले नसल्याचे डॉ. फुके म्हणाले.
“जंतरमंतरवरील आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि त्यानंतर विरोधकांना अचानक जाग आली. विरोधकांची भूमिका आता दीपकेंकडून घेतली जात असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे,” अशी टीकाही डॉ. फुके यांनी केली.
दीपकेंच्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडून केला जात असल्याचा आरोप करत डॉ. फुके म्हणाले की, “आजच्या मोर्चात भाड्याने आणलेले लोकही होते. गर्दी जमवून राजकीय ताकद दाखविण्याचा हा प्रयत्न होता.”
राज ठाकरे यांच्या MPSC आंदोलनातील सहभागावरही फुके यांची टीका
राज ठाकरे यांच्या MPSC आंदोलनातील सहभागाबाबत बोलताना डॉ. फुके यांनी मनसेच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “राज ठाकरे यांच्या पक्षात आता बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उरले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःच्या ताकदीवर कुठेही मोठे आंदोलन उभे करता येत नाही,” असे ते म्हणाले.
मुंबईत उबाठा गटासोबत मिळून आंदोलन करण्याची वेळ मनसेवर आली आहे. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मनसेकडे पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे दुसऱ्या पक्षांच्या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका फुके यांनी केली.
“स्वतःचे राजकीय दुकान सुरू ठेवण्यासाठी दुसऱ्या पक्षांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” असा टोला आमदार डॉ. परिणय फुके यांनी लगावला.



