Published On : Tue, Sep 21st, 2021

मुलांच्या सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने पालकांनो सहकार्य करा

Advertisement

– महापौर यांचे आवाहन ; राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभ

नागपूर : शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २१ ते २८ सप्टेंबर २०२१ जंतनाशक दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यादरम्यान लहान बालकांना पोटाचे विकार होऊ नयेत यासाठी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडून जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहेत. सर्व पालकांनी मनपाच्या चमूद्वारे वितरीत करण्यात येणा-या गोळ्या आपल्या पाल्यांना द्यावे.

लहान मुलांना पावसाळ्यात किंवा भविष्यात उद्भवणा-या पोटाच्या आजारांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही महत्वाची मोहिम असून संपूर्ण नागपूरकरांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या मुलांच्या सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने सर्व पालकांनी मनपाच्या या विशेष मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. मंगळवारी (ता. २१) धंतोली झोनमधील मनपाच्या बाबुलखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, वैद्यकीय आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन यांच्यासह धंतोली झोन सभापती वंदना भगत, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जैतवार, नोडल वैद्यकीय अधिकारी मंजु वैद्य, डॉ.स्वाती गुप्ता आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, त्यांच्या शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जंतसंसर्ग थांबविण्यासाठी जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर नियमित हात स्वच्छ धुवावेत, हाताची नखे नियमित कापावित, बाहेरून घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत, जंतसंसर्ग होणार नाही यादृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्याव, असे ते म्हणाले. याशिवाय जंत संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित होण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी द्यावी, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले.

मोहिमेत आशा वर्कर नागरिकांच्या घरो-घरी जाऊन जंतनाशक गोळ्या देणार आहेत. या विशेष मोहिमेच्या आयोजनाबद्दल मनपाचे आरोग्य विभागाचे महापौरांनी अभिनंदन केले. प्रत्यक्ष घरोघरी जाउन मोहिम यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान देणा-या सर्व आशा वर्कर्सना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या.