Published On : Mon, May 6th, 2024

स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचा उपक्रम विज्ञान तंत्रज्ञान शाखेद्वारे पालक शिक्षक संवाद सभा

Advertisement

वर्धा – सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेद्वारे आयोजित पालक शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत तसेच सहअध्यापनासाठी वातावरण निर्मिती संदर्भात सुसंवाद साधण्यात आला.

महाविद्यालयाच्या सभाकक्षात आयोजित या मुक्त संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचे संचालक डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा तसेच संचालक डॉ. क्षितीज राज, अधिष्ठाता डाॅ. पंकजकुमार अनावडे, उपसंचालक डॉ. दीपक शर्मा आणि स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या सभेत संवाद साधताना डॉ. गौरव मिश्रा यांनी भविष्यकालीन योजनांबाबत पालक व विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर डाॅ. अभ्युदय मेघे यांच्या हस्ते यावेळी सत्र परीक्षेतील गुणवंत आणि विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संवाद सभेत विविध विभागातील शिक्षकांनी प्रभावी अभ्यासाची कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध संसाधने याबाबत मार्गदर्शन केले. शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण उपक्रमांचा परिचयही यावेळी करून देण्यात आला. पालकांनी संस्थेबद्दल मांडलेले विचार आणि सूचनांचा स्वीकार करीत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रारंभी फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. चित्रा ढवळे यांनी प्रास्ताविकातून पालक आणि शिक्षक यांच्यातील मुक्त संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात सुरुवातीला प्रा. सुप्रिया नरड यांनी विभागीय सादरीकरण केले. प्रा. रीना सातपुते यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रा. कल्याणी साटोणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. शैलेश गहाणे, प्रा. प्रांजली उल्हे, प्रा. सुधीर आगरमोरे, प्रा. अतुल ठवरे, प्रा. सौरभ निमजे यांनी परिश्रम घेतले.