
नागपूर : नागपूरच्या पारडी परिसरात मोबाइल रिपेअरिंगच्या वादातून एका युवकाने तलवार लहरवत दुकानदाराला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने दुकानदाराच्या गळ्याजवळ तलवार फिरवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भट्टी चौक येथील पवन मोबाइल शॉपीमध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोबाइल रिपेअरिंगच्या कारणावरून दुकानदार पवन घुमडे आणि सूरज प्रवीण वाघमारे यांच्यात वाद झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर सूरज वाघमारे याने तलवार बाहेर काढली. त्याने दुकानदाराला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या गळ्याजवळ तलवार फिरवल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या प्रकरणी पारडी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून २५ वर्षीय आरोपी सूरज वाघमारे याला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत.



