Published On : Mon, Aug 28th, 2017

पणजी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विजयी; तर वाळपईतून विश्वजीत राणे यांचा विजय

पणजी: पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे. तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे. मनोहर पर्रीकर यांनी 4 हजार 803 मतांनी निवडणूक जिंकली. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ आता 14 झाले आहे. पणजीत काॅग्रेसला 5 हजार 60 मतं मिळाली. गोव्यात माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रिंगणात असल्याने प्रतिष्ठेची बनलेल्या आणि गोव्यासह सर्व देशाचे लक्ष लागून रहिलं होतं.

या निवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. भाजपतर्फे मुख्यमंत्री पर्रीकर सलग सहाव्यांदा पणजीत विजयी झाले आहेत. त्यानी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मंत्री विश्वजित यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांना पराभूत केलं.

निवडणुकीतील माझ्या विजयाने माझ्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या स्थिरतेवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हे शिक्कामोर्तब लोकांनी केलं. भाजपाप्रणीत आघाडी सरकारचं मनोधैर्य वाढलं आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री पर्रीकर यानी व्यक्त केली. मला पणजीत अपेक्षेपेक्षा फक्त 138 मते कमी मिळाली असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.

मतमोजणी पणजीत गोमेकॉच्या जुन्या इमारतीत झाली. तेथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली असून बुधवारी मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं या ठिकाणी आणली गेली. तेथे कडक पोलिस पहारा होता. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु झाली होती.