Published On : Wed, Apr 22nd, 2020

पालघर येथील साधूंच्या हत्येचा भाजपातर्फे तीव्र निषेध

नागपूर: पालघर जिल्ह्यात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकांची जमावाने पोलिसांसमक्ष काठ्यांनी मारून हत्या केली असतानाही पोलिस या साधूंना संरक्षण देऊ शकले नाही आणिशासनाने 4 दिवस या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेला गृहमंत्री अनिल देशमुख यांना जबाबदार ठरवून मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपा शहर व जिल्हा पदाधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ या घटनेच्या निषेधार्ह आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना भेटले व त्यांना एक निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महापौर संदीप जोशी उपस्थित होते.

या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. साधूंनी त्यांना संरक्षणाची मागणी केली असता साधूंना संरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. 16 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लीप 19 ला समाजमाध्यमामध्ये व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवाज उठवला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चार दिवसांनंतर म्हणजे 20 एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर प्रतिक्रिया दिली. वास्तविक उध्दव ठाकरे यांनी स्वत:च या घटनेची माहिती घेऊन चौकशीच्या सूचना द्यावयास हव्या होत्या. विरोधी पक्षाने आवाज उठविल्यानंतर सरकारला जाग आली. सरकारच्या या नीतीचा आपण निषेध करतो.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गैरसमजातून ही घटना घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधूंना रोकले असते तर हा प्रकार घडला नसता अशी शेलकी सबब सांगून पोलिसांच्या साक्षीने झालेले हे हत्याकांड किरकोळ स्वरुपाचे आहे असे चित्र निर्माण केल्याचे जाणवते आहे. अशा प्रकारे हत्याकांडांवर पांघरूण घालण्याचा प्रकारही निषेधार्ह आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. यापूर्वी ठाण्यात एका त़रूणाला मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली.


हजारो कोटींच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संचारबंदीच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. संचारबंदीच्या काळात चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला आणि पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. या घटनांना जबाबदार धरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून वरील घटनांची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. तसेच ठाणे येथील तरुणाच्या मारहाण प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.