Published On : Fri, Jun 11th, 2021

‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा’ देणार विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ

– विद्यार्थी शिक्षणासाठी मनपाचा विशेष पुढाकार


नागपूर : योग्य मार्गदर्शन आणि मिळालेल्या संधीचे सोने करीत मनपाच्या दोन विद्यार्थिनींनी नुकतेच अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न साकार केले. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये असे अनेक विद्यार्थी मोठी झेप घेण्यास पात्र आहेत. मात्र त्यांच्यातील कल्पनेला चालना मिळणे आवश्यक आहे. ही बाब हेरून नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा’ साकारण्यात येणार असून ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणार आहे.

स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर यांनी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्याशी चर्चा करुन शिक्षणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये विशेष तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, ‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा’ या प्रकल्पासाठी लागणारा सर्व निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सीएसआर मधून उपलब्ध करून देणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या गरोबा मैदान परिसरामध्ये बंद पडलेल्या मनपाच्या शाळेमध्ये आधुनिक प्रयोगशाळा साकारली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होणे, त्यांची रूची वाढविणे, त्यांच्यातील जिज्ञासूवृत्तीला चालणा देणे या उद्देशाने सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी आधुनिक विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार आहे. खेळातून विज्ञानाचे शिक्षण देणारी आनंददायी शिक्षण प्रणाली राबवून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ज्ञान दिले जाईल. नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यातून अनेक यशस्वी कथा पुढे आल्या. या मेळाव्याशी संलग्नीत मनपाच्या दोन शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात २५० शिक्षकांना प्रशिक्षण देउन खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान शिक्षण समजवून व शिकवून दिले आहे. हे कार्य एका छताखाली आणून शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान समजवून देण्यासाठी मनपाद्वारे पुढाकार घेण्यात येत आहे. शिक्षण समिती सभापती श्री. दिलीप दिवे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.


यासोबतच शहरातील विद्यार्थ्यांसाठी सैनिक पूर्व प्रशिक्षणाला सुद्धा मनपाद्वारे सुरूवात करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर मनपाद्वारे दुर्गानगर शाळेच्या परिसरात एक महिन्याचे ग्रीष्मकालीन सैन्य भरती प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याचे फलीत म्हणजे, एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर ३ विद्यार्थीनी सैन्य भरतीमध्ये यशस्वी झाल्या. शहरात वर्षभर असे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण दिल्यास शहरातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, ही बाब हेरून नागपूर महानगरपालिकेने सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्गासाठी पुढाकार घेतला आहे. नागपूर शहरातील माजी सैनिक संघटनांच्या सहकार्याने मनपाच्या बिजली नगर आर.बी.जी. शाळेच्या परिसरात वर्षभर मनपाच्या विद्यार्थ्यांना सैन्यपूर्व प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविण्याचा मनपाचा मानस आहे. विशेष म्हणजे, ७५व्‍या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपाद्वारे या प्रकल्पाची सुरूवात करण्याबाबत कार्यवाहीसाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी विशेष निर्देश दिले आहेत.