Advertisement

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर, टेका नाका परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून तीन जणांना अटक केली. या कारवाईत हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर आणि अन्य साहित्य असा सुमारे ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा पथकाला हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री मंगल डेअरीसमोरील प्लॉट क्रमांक २ येथे रात्रीच्या सुमारास छापा टाकण्यात आला. त्यावेळी ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून देत त्याचे सेवन करण्याची सुविधा दिली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी शाहरुख खान, शेख अरमान आणि मोहम्मद समीर अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




