Published On : Fri, Dec 15th, 2017

नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर 24 रायफल,19 पिस्तुल, चार हजार काडतुस जप्त

मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.

यावेळी 25 रायफल, 17 रिव्हालवर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

नेमकी घटना काय?

काल रात्री मालेगावजवळ वाके शिवारात गाडीत डिझेल भरल्यानंतर डिझेलचे पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवत हे तिघेही जण निघून गेले होते. यानंतर पेट्रोल पंप चालकाने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत चांदवड टोलनाक्याजवळ ही गाडी अडवून तिची झडती घेण्यात आली. तेव्हा या गाडीतून प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

हा शस्त्रसाठा लपविण्यासाठी या गाडीमध्ये विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांन ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या कसून चौकशी सुरु आहे.