Published On : Mon, Apr 24th, 2017

बाजारातील अधिकृत वापरकर्ते शनिवारी मांडतील शुल्काबाबत आपली बाजू

Mayor Pravin Datke

Mayor Pravin Datke (File Pic)


नागपूर:
शहरातील बाजारपेठांमधील अनेक जागा आणि दुकाने महापालिकेने व्यवसायिकांना भाड्याने दिली आहेत. येथील दुकानदारांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात आता बदल करण्यात येणार आहे. दरम्यान, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने माजी महापौर प्रवीण दटके यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती. महानगरपालिकेतर्फे बाजारातील वापर करण्यासाठी दिलेली दुकाने, जागा, ओटे आदींकरीता अधिकृत वापरकर्त्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कांसंदर्भात गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी आता दुपारी १२ च्या ऐवजी सकाळी १० वाजताच ही बैठक मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख सभागृह (स्थायी समिती सभागृह) घेण्यात येईल.

महानगरपालिकेतर्फे व्यावसायिकांकडून घेण्यात येणारे भाडे अत्यल्प आहे. सद्यस्थितीत बाजारपेठांमधील दुकानदार अत्यंत कमी भाडे देत असून लाखो रुपयांचा व्यवसाय करत आहेत.

गोकुळपेठ परिसरात महापालिकेची ७५ दुकाने, ५२ गाळे आणि ११२ खुल्या जागा आहेत, काही जागांचे मालकी हक्क परिवर्तित झाले आहे. बैठकीत याचे पुनर्निधारण केले जाईल. लकडगंज भागातील लोहा ओळीसारख्या परिसरात तर अनेक दुकानदार अद्यापही २ रुपये प्रति स्क्वेअर फूट या दराने भाडे देतात, त्यामुळे भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, दुकानांचे शुल्क वाढविण्याच्या प्रस्तावावर अनेक मतमतांतरे आहेत, त्यामुळे सर्व बाबी तपासून शुल्कवाढी संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी मनपाने दटके समिती नेमली. शहरात महापालिकेच्या ४ हजार ४३१ व्यवसायिक जागा आहेत. यामध्ये २ हजार ४८५ दुकाने, ८३४ गाळे व १ हजार ४१९ खुल्या जागा आहेत. मनपा स्थायी समितीने पारीत केलेल्या ठरावाप्रमाणे, वसूल करण्यात येत असलेल्या वापर शुल्काविरुद्ध महानगरपालिकेला बाजारातील दुकान, ओटे, जागांच्या अधिकृत वापरकर्त्यांच्या विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. संबधित विषयाच्या अभ्यास माजी महापौर प्रवीण दटके यांची एक सदस्यीय समिती करीत असून या समितीकडून प्राप्त अहवालावर निर्णय घेण्याचा अधिकार गुरुवार २० एप्रिल रोजी आयोजित बैठकित महापौर नंदा जिचकार यांना प्रदान करण्यात आला आहे.

बैठकीत दुकाने, जागा, ओटे अधिकृत वापरकर्त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेण्यात येईल. प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी, अध्यक्ष् , सचिव यांनी बाजू मांडण्यासाठी स्थायी समिती सभागृहात २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवीण दटके यांनी केले आहे.