Published On : Wed, Aug 18th, 2021

इतर अवयवदानासोबतच त्वचा दानाबद्दल जनजागृती करा

Advertisement

‘अवयवदान संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर : अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयवदानाने एखाद्या व्यक्तीला नवीन आयुष्य मिळू शकते, एखाद्याचा जीव वाचू शकतो. एखाद्याचे थांबलेले जगणे सुरु होऊ शकते. परंतु योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्णांचा अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांमध्ये अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. सध्या नागरिकांना नेत्रदान, रक्तदान, यकृत, मूत्रपिंड याबद्दल माहिती आहे; परंतु मृत्यूनंतर त्वचादान सुद्धा करता येते याबद्दलही जनजागृती करा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिलेश वैरागडे आणि कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांनी केले.

अवयवदान जनजागृती सप्ताहानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मंगळवारी (ता. १७) नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिलेश वैरागडे आणि कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी ‘नेत्रदान आणि त्वचादान’ या विषयावर संवाद साधला आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निखिलेश वैरागडे म्हणाले, भारतात जवळपास दीड कोटी अंध व्यक्ती आहेत. यातील ४५ लाख रुग्ण बुबुळाच्या अंधत्वाने ग्रासले आहेत. यात दरवर्षी २० ते २५ हजार रुग्णांची भर पडत असते. सध्या नेत्रदान करणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. परंतु देशातील अंध व्यक्तींची संख्या पाहता होणारे नेत्रदान खूप कमी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात अवयवदानाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान करू शकते. यासाठी कोणतीही पात्रता नाही. नंबरचा चष्मा असलेले व्यक्ती, शुगर, ब्लड प्रेशर असणारे व्यक्तीसुद्धा मृत्यूनंतर नेत्रदान करू शकतात. यासाठी वयाचेही बंधन नाही. यासाठी एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे नेत्रदान करण्याची इच्छा. इच्छा, संकल्प असेल तर कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान करू शकते, अशी माहिती यावेळी डॉ. निखिलेश वैरागडे यांनी दिली.

नेत्रदान कोण करू शकत नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, ज्यांना एचआयव्ही, व्हायरल आजार, ब्लड कॅन्सर आहे, अशा व्यक्तींना नेत्रदान करता येत नाही. मात्र इतर व्यक्तींनी जास्तीत जास्त नेत्रदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार म्हणाले, इतर अवयवदानाप्रमाणे त्वचादान सुद्धा करू शकतो. त्वचादान करून जळीत किंवा अपघातात त्वचा निघून गेली असेल तर अशा रुग्णांना नवीन त्वचा, नवीन जीवनदान मिळू शकते. नागपूरमध्ये पहिली स्कीन बँक २०१४ साली सुरु झाली. तेव्हापासून आतापर्यंत ४५ दात्यांनी त्वचादान केले आहे. ही त्वचा ६५ पेक्षा जास्त रुग्णावर वापरण्यात आली. स्कीन बँक सुरु झाली तेव्हा लोकांना माहिती नव्हतं की त्वचादान सुद्धा करता येतं. यासाठी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करावी लागली. कारण नेत्रदान, लिव्हर, हृदय किंवा किडनी दानाबद्दल नागरिकांना चांगल्या रीतीने माहिती आहे. मात्र माणसाची त्वचा सुद्धा दान करता येते हा विषय अनेक लोकांना माहिती नव्हता आणि आता सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यामुळे त्वचादानाबद्दल समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, नेत्रदानाप्रमाणे त्वचादानाचा सुद्धा अनेक लोकांना जीवनदान देण्यासाठी फायदा होतो. जळीत रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत असतो. यामुळे त्यांची त्वचा निघून गेलेली असते आणि यासाठी खूप दिवस दवाखान्यात भरती सुद्धा राहावं लागत असते. सोबतच या उपचार पद्धतीवर खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र त्वचादान केल्यास संबंधित रुग्णाला जास्त दिवस भरती राहावं लागत नाही. रुग्णाचा त्रास कमी होतो. सोबतच उपचार करण्यासाठी लागणारा खर्चसुद्धा कमी येतो आणि त्या रुग्णाला नवीन जीवनदान देण्यास मदत होते. यासाठी त्वचादान करणे गरजेचे आहे ,असे डॉ. समीर जहागीरदार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, भारतात दरवर्षी जवळपास ७० लाख जळालेले रुग्ण येतात. दुर्दैवाने यापैकी ५० टक्के म्हणजे ३५ लाख रुग्णांचा मृत्यू होतो आणि यातील ७० टक्के रुग्ण १५ ते ३५ या वयोगटातील असतात. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. यामुळे अनेक कुटुंब प्रभावित होत असतात. म्हणून अशा रुग्णांना त्वचादान केल्यास खर्चात मोठी बचत करता येऊ शकते. १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्ती मृत्यूनंतर त्वचादान करू शकतात. मात्र ज्यांना एचआयव्ही, एड्स, कोणतेही त्वचा रोग किंवा कोविड-१९ असलेले व्यक्ती त्वचा दान करू शकत नाही. सोबतच जे व्यक्ती त्वचादान करतात त्यांच्या घरी स्कीन बँकची टीम येऊन त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण करीत असतात. यात दात्याच्या दोन्ही हात आणि दोन्ही पायाची त्वचा काढली जाते. विशेष म्हणजे एका व्यक्तीची त्वचा कितीही व्यक्तींना वापरता येऊ शकते आणि त्वचा पाच वर्षापर्यंत साठवून ठेवली जाऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण माहिती प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांनी दिली. सोबतच त्वचादानाबद्दल समाजत जनजागृती निर्माण करून यासाठी समोर येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.