Published On : Sat, Jun 9th, 2018

तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशही ठेंगणे

Advertisement

कन्हान: घरात जेमतेम परिस्थिती. असाध्य असा आजार. मात्र शिकण्याची जिद्द. या जिद्दीच्या भरवशावर तिने तब्बल ६६ टक्के गुण मिळवून यशालाही ठेंगणे केले. या जिद्दी मुलीचे नाव आहे सलोनी संजय कोलते. हनुमान नगर कन्हान येथे राहणाऱ्या बबीता व संजय कोलते यांच्या वृक्षवेलीवर सप्टेंबर २००१ मध्ये सलोनी या मुलीचा जन्म झाला. जन्मतःच तिच्यात व्यंग असल्याने इटारसी येथील वैद्यकीय चमूने तपासणी केली. यात सलोनी हिला अस्थीजनन अपूर्णता (Osteogenesis Imperfecta) हा आजार असल्याचे सांगितले. यातही हिचे भविष्य फार काळ नसल्याचे सांगून जगण्याची आशा धूसर केली होती.

अस्थीजनन अपूर्णता ( Osteogenesis Imperfecta) या आजारामुळे तिचे हाड जागोजागी तुटले जाऊ लागले. त्यामुळे तिला उचलण्यातही कुटुंबाला त्रास होवू लागला. तिच्या या आजारामुळे तिची उंची केवळ दोन फूट असून वजन ११ किलोग्रॅम आहे. तिच्यात शिकण्याची अपार जिद्द असल्याने तिने यावर्षी इयत्ता दहावीची परिक्षा बळीराम दखने हायस्कूल कन्हान येथून लेखनिकच्या साह्याने दिली. तिला लेखनिक म्हणून इयत्ता नववीच्या जयश्री हिवसे या मुलीने मदत केली. सलोनी हिने या परिक्षेत थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६.६० टक्के गुण प्राप्त केले.

सलोनी हिच्या अभ्यासाविषयी माहिती घेतली असता तिने U-Tube च्या साह्याने अभ्यास केला असल्याचे सांगून तिची लहान बहिण समिक्षा हिने अभ्यासात मदत केली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे समिक्षा सुध्दा यावर्षी दहावीत असून तिला ९२ टक्के गुण प्राप्त झाले आहे. मला गाण्याची आवड असून रेडिओ जाॅकी म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे असे आवर्जून तिने सांगितले. तिला मराठी व इंग्रजी भाषेचे अस्सलिखित ज्ञान असून ती स्मार्टफोन सुध्दा हाताळते. तिच्या

या यशाने तिचे आई वडील सुध्दा हरखून गेले असून त्यांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुस-या डोळ्यात पाणी आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यशही ठेंगणे करणा-या सलोनीचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, कन्हान पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार, कमल यादव आदींनी सत्कार केला.