Published On : Tue, May 16th, 2017

दिव्यांगासाठी उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Advertisement


नागपूर:
नागपूर महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थांसाठी २५ एप्रिल ते २५ मे दरम्यान उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थांना नृत्य, संगीत, क्राफ्ट, स्पर्शज्ञान या विषयावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अंपग समावेशित शिक्षण हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या अपंग मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाबरोबरच नृत्य, संगीत, शारीरिक शिक्षण, नाट्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा समान संधी मिळावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.


नागपूर शहरात तीन जागी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत स्टेडीयम येथील क्रीडा प्रबोधिनी हॉल, लालबहादूर शास्त्री माध्यामिक शाळा, दुर्गानगर, रमाबाई आंबेडकर माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळा या तीन जागी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर शहरातील पालक, शिक्षक, अपंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संघटना व तज्ज्ञ व्यक्ती यांनी आपल्या परिसरातील अपंग विद्यार्थांना माहिती देऊऩ त्यांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.