Published On : Fri, Mar 30th, 2018

नागपुरात उद्या प्रमुख शेतकरी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन


नागपूर : शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभा, लोकसभा यासारख्या सभागृहात जायला हवेत, त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे अशक्य आहे. हा विचार घेऊन त्याबद्दल पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील निवडक मान्यवर नेत्यांची महत्वपूर्ण बैठक उद्या दुपारी १२ नागपुरातील राष्ट्रभाषा सभा, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे ऐतिहासिक संपावर जाणे, देशपातळीवर शेतकऱ्यांच्या १९० संघटनांनी एकत्र येणे, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये होणारी वाढ, त्याविरुद्ध शेतकरी आणि ग्रामीण जनतेमध्ये सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आक्रोश, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकारची पोकळ जुमलेबाजी, सत्ताधाऱ्याकडून शेतकरी आंदोलकांची निंदा नालस्ती, वारंवार होणारा विश्वासघात आणि एकंदरीतच ६५/७०% मतदार असूनही शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्याकडून नेहमीच भिकाऱ्यासारखी वागणूक देणे, ह्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याची माहिती लोकजागर अभियान तर्फे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिलेली आहे.

येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन नवा पर्याय देण्याच्या दिशेने कश्याप्रकारे वाटचाल करता येईल, त्यातील अडथळे कोणते, जात, पात, धर्म बाजूला सारून शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ म्हणूनच मतदान केले पाहिजे. शेतकरी हीच आमची जात आणि तोच आमचा धर्म या निष्ठेने एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात किसान जागृतीच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने ही महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शेतकरी नेते अमर हबीब, विजय जावंधिया, ऍड वामनराव चटप, श्रीकांत तराळ, प्रा शरद पाटील, अनिल घनवट, चंद्रकांत वानखडे, किशोर माथनकर, अनंत देशपांडे, राम नेवले, गजानन अमदाबादकर, संजय कोल्हे, गजू निकम, ललित बहाळे आदी मान्यवर शेतकरी नेत्यासोबतच काही विचारवंत, साहत्यिक, पत्रकार, माजी प्रशासकीय अधिकारी यांनाही निमंत्रित केलेले आहे.

तसेच माजी जिल्हाधिकारी इ झेड खोब्रागडे, माजी जॉईंट कमिश्नर (सेलटॅक्स), पुरुषोत्तम गावंडे संपादक, अविनाश दुधे, डी के आरिकर, सुरेश रामगुंडे संपादक, देविदास लांजेवार, दगडू पडिले, पत्रकार प्रवीण गीते, डॉ सदानंद इंगळे, डॉ अनिल कुर्वे, मनीष नांदे, विशाल चौधरी, भरत पांडे, निकेश आमने,डॉ सुशांत पिसे, महादेव मिरगे यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील निवडक मान्यवर या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार आहेत.