वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील शालिनीताई मेघे नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘प्राणिक हीलिंग’ या प्राचीन व परंपरागत प्रभावी उपचार पद्धतीवर व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले.
परिचारिका महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या व्याख्यान सत्रात ख्यातनाम प्राणिक हीलिंग तज्ज्ञ तथा प्रशिक्षक डॉली शहा, निलेश काटे व रजनी मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
या उपचार प्रणालीमागील तत्वज्ञान, जैव ऊर्जा, नैसर्गिक व वैज्ञानिक सहसंबंध, मूळपद्धती, मानसिक शांती, शारीरिक दुखण्यांवर नियंत्रण तसेच अध्यात्मिक आरोग्यासाठी उपयुक्तता, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासोबतच दैनंदिन जीवनातील ताणतणावांच्या नियोजनाकरिता नियमित वापर, आदी विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना काही सोपी प्राणिक हीलिंग तंत्रे प्रात्यक्षिकासह शिकविली. अंतिम प्रश्नोत्तराच्या सत्रात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाला शालिनीताई मेघे बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना शर्मा, कॉलेज ऑफ जीएनएम नर्सिंगच्या प्राचार्य अख्तरीबानो सैय्यद शेख, श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली ताकसांडे, उपप्राचार्य सविता पोहेकर, स्कूल ऑफ नर्सिंगच्या उपप्राचार्य मीनाक्षी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन सार्थक मेघे यांनी केले. या आयोजनात शिक्षिका प्रतिभा वानखेडे, माधुरी खडतकर, प्रशासकीय अधिकारी प्रणिता पोहणेकर यांचे सहकार्य लाभले.