Published On : Sat, Jan 20th, 2018

१ फेब्रुवारीपासून नागपुरात ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव


नागपूर: नागपूर महानगरपालिका, नागपूर, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या सहकार्याने १ फेब्रुवारीपासून नागपुरात दुसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार, ऑरेंज सिटी फिल्म फेस्टीवल आयोजन समितीचे सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.

१ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवाचे उद्‌घाटन १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पर्सिस्टंट सभागृहात होईल. यावेळी जागतिक पातळीवर भारतीय चित्रपटांना विशेष स्थान प्राप्त करून देणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन्‌ आणि मूळचे विदर्भातील असलेले संगीतकार राम-लक्ष्मण यांचा आयोजकांच्या वतीने विशेष गौरव करण्यात येणार आहे.

३१ अप्रदर्शित चित्रपट आणि २९ लघुपटांची मेजवानी

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील ३१ अप्रदर्शित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये काही भारतीय चित्रपटही असून पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काही चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि कलावंतांची चमूही उपस्थित राहणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अदूर गोपालकृष्णन आणि रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत
चित्रपट दिग्दर्शक आणि सत्कारमूर्ती अदूर गोपालकृष्णन्‌ आणि कलावंत रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल हे अदूर गोपालकृष्णन्‌ यांची मुलाखत पीव्हीआर सिनेमागृहात घेतील तर आयोजन समितीतील अजेय गंपावार हे पर्सिस्टंटच्या कालिदास ऑडीटोरियमध्ये रोहिणी हट्टंगडी यांची मुलाखत घेतील.

निळू फुले संवादमाला
महोत्सवादरम्यान निळू फुले स्मृति संवादमालेत प्रसाद लॅबचे मोहन कृष्णन हे फिल्म पोस्ट प्रॉडक्शनवर संवाद साधतील. नागपूर व विदर्भातील चित्रपट, शॉर्टफिल्म, डॉक्युमेंट्रीज, दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही कार्यशाळा राहणार आहे. ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि त्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत प्रेक्षकांचा संवाद हा कार्यक्रमही उत्सवांतर्गत राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे. पत्रपरिषदेला मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. हिरेखण, धर्मेश धवनकर, सप्तकचे उदय गुप्ते, रवींद्र डोंगरे, अजेय गंपावार आदी उपस्थित होते.