‘युती सरकारचे दोनच लाभार्थी; एक भाजप, दुसरे उद्धव ठाकरे’: राधाकृष्ण विखे पाटील

Advertisement

नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. ‘राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारचे केवळ दोनच लाभार्थी आहेत. एक म्हणजे भाजप आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे’, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्याकालात झाल्याची टीकाही विखे पाटील यांनी केली. नागपुरात झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे कारण मंत्री त्याला विश्वास देऊ शकले नाहीत असा आरोप विखे पाटील यांनी म्हणाले. तीन वर्षांच्या काळात १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही ते म्हणाले. ज्या ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला अशा शेतकऱ्यांची नावे तातडीने राज्य सरकारच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात यावीत, यानंतरच खरे काय ते समोर येईल असे मागणी वजा आव्हानही विखे- पाटील यांनी सरकारला दिले आहे.