शेतकरीद्रोही सरकारचा स्थगन प्रस्तावाला विरोध – सुनिल तटकरे यांचा आरोप

Advertisement


नागपूर: खोटारडया पध्दतीने शेतकऱ्यांची केलेली फसवी कर्जमाफी आणि बोंडअळीच्यामुळे उध्वस्त झालेला विदर्भ, मराठवाडयातील शेतकऱ्यांना या सरकारने दुर्लक्षित केल्यामुळे यासंदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला या शेतकरी द्रोही असलेल्या सरकारने विरोध केला.आश्चर्याची बाब अशी की,सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील हेच शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरणामध्ये अग्रेसर होते हे महाराष्ट्रातील जनतेला त्यांचं खरं स्वरुप आज त्यांनी मांडलेल्या भूमिकेतून कळले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार सुनिल तटकरे यांनी दिली.

आम्हाला हेच सरकारच्या निदर्शनास आणून दयायचे होते की,या बोंडअळीने उध्दवस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत सरकारने दिली पाहिजे आणि त्याचबरोबर ओखी वादळामध्ये उध्दवस्त झालेला कोकणातील आंबा उत्पादक,भात उत्पादक,स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी यांच्या नुकसानभरपाईचे पंचनामे या सरकारने केले पाहिजेत. पण खोटरडेपणाचा कळस असा की, बोंडअळीचे संकट येवू शकते असे पत्राद्वारे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जुलै महिन्यामध्ये सरकारला कळवूनसुध्दा या नाकर्त्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्याच्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी प्रचंडप्रमाणात संकटात आला. जवळपास ४० ते ५० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.


यासंदर्भात पोटतिडकीने आम्ही शेतकऱ्यांची भूमिका याठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु सत्तारुढ सरकारकडून शेतकऱ्यांच्या भूमिका मांडण्याला विरोध करण्यात आला त्याचा आम्ही याठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध केला असे आमदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.

जोपर्यंत सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्याला २५ हजार रुपये एकरी मदत जाहीर करत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू दयायचे नाही असा संयुक्त निर्णय घेण्यात आल्याचेही प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. विधानपरिषदेमध्ये शेतकऱ्यांची बाजु मांडण्यासाठी दिली नसल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत सभात्याग केला.