पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोट बांधली आहे. यापार्श्वभूमीवर पाटणामध्ये उद्या भाजपविरोधी महाआघाडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत एकास एक उमेदवार या दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्यावर सहमती झाली तर किमान समान कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकेल. मोदी सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाआघाडीचा अजेंडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर मात करायची असेल तर राज्या-राज्यात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला पाहिजे हा मुद्दा विरोधी पक्षांनी मांडला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने जातिनिहाय जनगणना केली असली तरी, सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी तामीळनाडूतील सत्ताधारी ‘द्रमुक’ने दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनामध्ये जातिनिहाय जनगणना व आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपेतर विरोधी पक्षांची परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या माकप व भाकप या डाव्या पक्षांनीदेखील जातिनिहाय जनगणनेची मागणी केली होती. तामीळनाडूने पहिल्यांदा ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली. काँग्रेसने कर्नाटकमध्ये भाजपचा हिंदुत्वाच्या प्रचाराला लक्ष्य करत दलित-आदिवासींची मते मिळविली होती. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून जातिनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. विरोधकांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी झाली आहे.
महाआघाडीच्या बैठकीची तयारी पूर्ण झाली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल तसेच, शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे शुक्रवारी सकाळी मुंबईहून थेट पाटण्याला पोहोचतील. दिल्लीतून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी वेणुगोपाल, जयराम रमेश आदी नेतेही पाटण्याला रवाना होतील. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी व द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन हे दोघे मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत पाटण्यात पोहोचणार असल्याचे कळते. याशिवाय, राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे प्रमुख फारुक अब्दुल्ला, ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी, ‘भाकप’चे महासचिव डी. राजा असे किमान १८ हून अधिक विरोधी पक्षांचे प्रमुख व नेते उपस्थित राहणार असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.