नागपूर – शहरात दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातांमागे एक मोठं कारण म्हणजे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं. या गंभीर समस्येला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता थेट रस्त्यावर उतरत ‘ऑपरेशन यू-टर्न’ नावाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची घोषणा पोलिस आयुक्त रविंदर सिंगल आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त लोहित मतानी यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘ऑपरेशन यू-टर्न’ ही मोहीम केवळ नियमबाह्य चालकांवर कारवाई करण्यापुरती मर्यादित नसून, शहरात सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. शहरात विविध ठिकाणी तपासणीसाठी नाकाबंद्या केल्या जात असून, मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. वाहन जप्त करणे, परवाना रद्द करणे आणि पुनरावृत्ती करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणे, हे यामागे फक्त शिक्षा नव्हे तर एक सामाजिक संदेशही आहे.
पोलिसांनी शहरातील पब, बार आणि महाविद्यालयांमध्येही जनजागृती मोहीम राबवण्याचे नियोजन केले असून, वाहन चालकांना मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नये यासाठी सतत सूचना दिल्या जात आहेत. स्मार्ट ट्रॅफिक बूथ्सवरूनही आवाजाच्या माध्यमातून इशारे दिले जात आहेत.
या मोहिमेचा परिणामही दिसू लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांची आणि मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत घातक अपघात आणि मृत्यूंचं प्रमाण घटलं आहे, जे या मोहिमेच्या यशाकडे स्पष्ट संकेत देतं.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि डीसीपी लोहित मतानी यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्यापुरते नाही, तर नागपूरच्या रस्त्यांवरून जीव गमावणाऱ्या निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. “प्रत्येक जीव अमूल्य आहे, आणि नशेत गाडी चालवणं म्हणजे इतरांच्या जिवाशी खेळणं, असं मत मतानी यांनी व्यक्त केलं.
‘ऑपरेशन यू-टर्न’ ही केवळ एक मोहीम नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. नागपूरकरांनी ती ओळखण्याची हीच वेळ आहे. नियम पाळा, जबाबदारीने वाहन चालवा आणि इतरांचे जीवन सुरक्षित ठेवा.