Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

“ऑपरेशन थंडर”; नागपूर पोलिसांची नशेच्या विरोधात निर्णायक मोहीम

डीसीपी रश्मिता राव यांचा विशेष अहवाल
Advertisement

नागपूर – महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’च्या माध्यमातून आक्रमक कारवाई सुरू केली आहे. मार्च 2024 ते जून 2025 या कालावधीत नागपूर शहर पोलिसांनी एकूण 540 गुन्हे दाखल करत 730 जणांना अटक केली असून 8.6 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

या कारवाईत एमडी (म्युफेड्रोन), गांजा, चरस, अफू, डोडा यासारख्या प्रतिबंधित पदार्थांचा समावेश असून सोशल मीडिया, कुरिअर सेवा आणि डार्कनेटचा वापर करून ड्रग्सचा प्रसार होत असल्याचे उघड झाले आहे.

‘झिरो माईल’ ते ड्रग ट्रान्झिट हब-
राष्ट्राच्या मध्यबिंदूवर असलेल्या नागपूर शहरामध्ये शिक्षण, औद्योगिक व स्थलांतरित लोकसंख्येच्या वाढीमुळे ड्रग्जचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर आता केवळ संत्र्यासाठी किंवा वाघांसाठी नव्हे, तर मुंबई-हैदराबाद-कोलकाता या ट्रान्झिट मार्गावर एक महत्त्वाचे ड्रग हब बनत चालले आहे.

“गुन्हेगार” की “रुग्ण”? रश्मिता राव यांचा दृष्टिकोन-
अनेक वेळा अटक केलेला तरुण न्याय मागत नाही, उपचार मागतो.
असा अनुभव शेअर करताना डीसीपी रश्मिता राव यांनी सांगितले की, अनेक व्यसनाधीन तरुण गुन्हेगार नसून व्यसनरूपी आजाराचे बळी असतात. त्या म्हणतात,व्यसन हे गुन्ह्याने नव्हे, तर जिज्ञासेने सुरू होते. वेळेत मार्गदर्शन न मिळाल्यास ती जिज्ञासा नाशाचे कारण बनते.

Advertisement

भारतामध्ये सध्या ड्रग वापर गुन्हा मानला जातो, पण NDPS कायद्यातील कलम 64A अंतर्गत उपचारासाठी पुढे आलेल्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. मात्र या तरतुदींची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे त्या स्पष्ट करतात.

“ऑपरेशन थंडर” – तिन्ही आघाड्यांवर हल्ला
अंमलबजावणी (Enforcement):
2024 पासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत बुटीबोरी, वर्धा रोड यांसारख्या लॉजिस्टिक पॉइंट्सवर तातडीने धाडसत्र राबवून पेडलर नेटवर्कवर कडक कारवाई करण्यात आली. शेजारील राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून ड्रग्स जप्ती वाढवली गेली आहे.

जागरूकता मोहिमा (Engagement):
प्रत्येक महिन्यात शाळा व कॉलेजांमध्ये अधिकारी स्वतः उपस्थित राहून संवाद साधतात. “डंडा नव्हे, संवाद” या तत्त्वावर आधारित या उपक्रमांतून मुलांमध्ये भीती न निर्माण करता विश्वास वाढवण्यावर भर दिला जातो.

समाजसहभाग (Collaboration):
2025 च्या सुरुवातीपासून नागपूरच्या ड्रगप्रभावित परिसरात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे “डायव्हर्जन अ‍ॅक्टिव्हिटीज” राबवले जात आहेत. UNODC व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून नागपूरमध्ये स्थानिक उपाययोजना तयार केल्या जात आहेत.

राज्यपातळीवरील आकडेवारी धक्कादायक-
2024 मध्ये महाराष्ट्रात एकूण 4,249.90 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त झाले असून 14,230 व्यक्तींना अटक करण्यात आली. यातील बहुतांश आरोपी हे 15 ते 30 वयोगटातील तरुण आहेत, हे विशेष चिंतेचे आहे.

“सुटकेचा मार्ग शिक्षेहून पुढे आहे” – राव यांचा समाजाला संदेश
सार्वजनिक आरोग्याचं रक्षण केवळ शिक्षा देऊन होत नाही; त्यासाठी सहानुभूती, समुपदेशन आणि उपचार आवश्यक आहेत. तीन मूलभूत भूमिका – पालक, शिक्षक, आणि सामान्य नागरिक – या सर्वांनी मिळूनच या समस्येवर मात करता येईल, असा विश्वास रश्मिता राव व्यक्त करतात. टेक कंपन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ड्रग विक्री थांबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि 112 आपत्कालीन हेल्पलाइनवर कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आज साथ दिलीत तर उद्या हसता येईल-
खाकी गणवेषामागे एक आई आहे, जिला प्रत्येक हरवलेल्या लेकराचं दु:ख समजतं. आणि एक अधिकारी आहे, जिला हे हरवलेले जीवन परत मिळवायचं आहे,चला, आपण नागपूरला फक्त ‘स्वच्छ’ नव्हे, तर ‘स्वस्थ आणि नशामुक्त’ बनवूया, अशा शब्दांत डीसीपी रश्मिता राव यांनी नागपूरकरांना थेट आवाहन केलं आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.