नागपूरः नागपूरः जागतिक महिला दिनानिमित्त टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नागपुरातील महिला पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर अॉफ फॉरेस्ट शोमिता बिश्वास होत्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. व्ही. चंद्रा यांना स्त्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नी श्रीमती शोभा विनोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा ‘शोभा विनोद स्मृती वुमेन जर्नलिस्ट अॅवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार वर्षा बाशू यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह व २१ हजार रुपये असे होते.
हा पुरस्कार गेल्या पाच वर्षांपासून दिला जातो आहे. या पुरस्काराने आतापर्यंत, ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, कल्पना नाळस्कर, राखी चव्हाण यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. श्रीमती शोभा विनोद स्मृती पुरस्कारामागील पार्श्वभूमी एस.एन. विनोद यांनी प्रास्ताविकातून विशद केली. पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्रदीप मैत्र यांनी केले.
महिला पत्रकारांमध्ये, विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या स्नेहल नितीन जोशी (सुदर्शन चॅनेल) जयश्री दाणी (तरुण भारत), व निधी वासवानी (हितवाद) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाईम्समधील न्यूज एडिटर मनोज मोहिते यांच्या पत्नी सोनाली अकोलकर यांनाही यावेळी विशेषत्वाने पुरस्कृत करण्यात आले.
आपल्या मनोगतात अॅड. चंद्रा यांनी नागपुरातील पत्रकारितेच्या क्षेत्राचा आढावा घेऊन, सध्याचा काळ हा पत्रकारांसाठी आव्हानाचा असल्याचे म्हटले. महिला पत्रकारांनी अधिक सक्षमपणे कार्य करून आपल्या कामात सचोटी राखावी असे आवाहन त्यांनी केले. जर देशात क्रांती घडवायची असेल तर ती महिला पत्रकार घडवू शकतात असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात शोमिता बिश्वास यांनी, मुलामुलींच्या अगदी बाल्यावस्थेतील संगोपनापासून होत असणाऱ्या विसंगतीकडे लक्ष वेधत, या परिस्थिती बदल होण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर दिले.
व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक एस.एन. विनोद, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर पत्रकार संघाचे सरचिटणीस शिरीष बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बाशू यांनी तर आभारप्रदर्शन शिरीष बोरकर यांनी केले. कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.