Published On : Wed, Dec 27th, 2023

महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

Advertisement

नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर होणाऱ्या या रॅलीच्या दमदार आयोजनासाठी काँग्रेस नेत्यांनी ताकद लावली आहे. मंगळवारी युवक काँग्रेसने बाइक रॅली काढून महारॅलीसाठी शहरात जागर केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत विविध समित्या जाहीर करीत सभेच्या आयोजनासंदर्भात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. उपरोक्त वरिष्ठ नेत्यांसह माजी मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, गिरीश पांडव यांच्यासह विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.

‘भारत जोडो बाइक’ रॅलीने लक्ष वेधले
२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरात ‘भारत जोडो’ बाइक रॅली काढण्यात आली. तीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राष्ट्रीय सचिव अजित सिंह, एहसान खान, आतिशा पैठनकर, शिवराज मोरे, श्रीनिवासन नालंवार, मिथिलेश कन्हेरे, तौसीफ खान, आसिफ शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संघभूमीतून भाजपला उत्तर देणार : चव्हाण
केंद्रातील भाजप सरकार बेरोजगारी, महागाई तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस भाजपला चोख उत्तर देणार असल्याचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.