मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (३० जून) सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) आणि अन्य विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवलं.
सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ‘मी मराठी’ अशा घोषणा असलेल्या टोप्या घालून विधानभवनात दाखल झाले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खास मी मराठी टोपी घालून दिली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्या दृश्याकडे वेधले गेले. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात सौहार्दपूर्ण हस्तांदोलनही झाले. भास्कर जाधव आणि अजय चौधरी यांसारखे नेतेही टोपीसह आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, विधीमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला. आज नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित अध्यादेश सभागृहात सादर करण्यात येणार आहे. त्यासोबतच २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पुरवणी मागण्याही मांडल्या जातील. शोकप्रस्ताव सादर झाल्यानंतर आजचे कामकाज पूर्ण होणार आहे.
उद्धव ठाकरे देखील काही वेळात विधानभवनात दाखल होणार असून, दुपारी २ वाजता ते आझाद मैदानात एका कार्यक्रमात सहभागी होतील, त्यानंतर तीन वाजता सिल्व्हर ओक येथेही त्यांची उपस्थिती राहणार आहे. विरोधकांच्या सुरुवातीच्या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काही दिवस हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.