नागपूर : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरुच आहे. नुकतेच कर्नाटकातील बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा दहशतवादी अफसर पाशा याने गडकरी यांना बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी दिली.
यानंतर नागपूर पोलिसांनी अफसर पाशाला बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले आणि विमानाने नागपुरात आणले. पाशाला धंतोली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाशाला पाच दिवसांची म्हणजेच १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पाशा हा धंतोली पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाही.तो कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. वारंवार चुकीची माहिती देत असल्याचा आरोप धंतोली पोलिसांनी केला.
सध्या अफसर पाशा धंतोलीच्या कोठडीत बंद असून त्याची जयेश पुजारीच्या समोर चौकशी करण्यात येईल. अफसर पाशा हा विवाहित असून त्याचे कुटुंब जम्मू काश्मिरमध्ये राहते. मात्र, गेल्या २००६ पासून अफसर पाशा हा बेळगाव कारागृहात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पैसे आणि बॉम्बस्फोट करण्याची धमकी पाशानेच जयेश पुजारीला देण्यास भाग पाडले होते.पुढच्या आठवड्यात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोन्ही दहशतवाद्यांना एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.